लॉकडाऊन काळात कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी वाढल्या
- Dr Shraddha Deshpande
- July 17, 2021
लॉकडाऊनच्या काळात कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी करून घेण्याचा कल वाढला आहे. गेल्या दीड वर्षात अशा प्रकारच्या सर्जरी मध्ये 30 ते 40 % वाढ झाली आहे. महत्वाचे म्हणजे या सर्जरी करून घेण्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुष काहीसे पुढे आहेत.
तरुण वयात चेहऱ्यावरील सुरकुत्या,वाकडे नाक-कान,वाढलेले पोट,बाह्या,मांडीचे वाढलेले स्नायू यावर कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी चा पर्याय पुढे आला आहे. अनेकजण या सर्जरी करून आपले शरीर मनाजोगे करून घेताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात अशा सर्जरी करून घेण्याचे प्रमाण साधारणता 30 ते 40 % वाढले आहे अशी माहिती डॉ.श्रद्धा देशपांडे प्लास्टिक सर्जन,ओकहार्ट हॉस्पिटल मुंबई सेंट्रल यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे अनेकांनी ‘वर्क फ्रॉम होम’ चा पर्याय स्विकारला. घरातूनच काम करत असल्याने लोकांना आरामासाठी वेळ मिळू लागला. यातच मग लोकांनी आपल्या शरीरावर कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी करून घेण्याचा पर्याय निवडला असे ही डॉ श्रद्धा देशपांडे म्हणाल्या. कुठली ही सर्जरी एका दिवसात होते,त्यानंतर साधारणता 2 ते 3 आठवडे घरात आराम करावा लागतो. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे लोकं घरातच होती शिवाय त्यांच्याकडे वेळ ही असल्याने अनेकांनी या काळात सर्जरी करून घेणे पसंत केले असे ही डॉ. देशपांडे पुढे म्हणाल्या. अशा सर्जरी सर्वच फिल्ड मधील लोकं करून घेत आहेत,मात्र आईटी मधील तरुण तरुणांची संख्या अधिक आहे. 25 ते 40 वयोगटातील तरुणांमध्ये या सर्जरी करून घेण्याची संख्या अधिक आहे. आम्ही दररोज 2 ते 3 सर्जरी करून घेत असून 10 ते 15 लोक दररोज सर्जरी बाबत चौकशी करत असल्याचे ही डॉ.देशपांडे म्हणाल्या.
सध्या प्रत्येक जण आपल्या ‘लूक’ बाबत ‘काँशीयस’ झाला आहे. सध्या ‘व्हिडीओ’ आणि ‘सेल्फी’ चा जमाना असल्याने प्रत्येकाला आपली ‘पर्सनॅलिटी’ सुधारावी असे वाटते. त्यातून अनेकजण कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी चा पर्याय स्विकारत असल्याचे डॉ. देवयानी बर्वे प्लास्टिक आणि ऍस्थेटिक सर्जन,नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी सांगितले. सिनेमा,टीव्ही सिरीयल मधील काम करणारे कलाकार,न्यूज चॅनेल्स चे ऍंकर यांचे देखील प्रमाण अधिक असल्याचे ही डॉ.देवयानी बर्वे सांगतात.
महिलांमध्ये ‘ब्रेस्ट काँशीएसनेस’ अधिक आला आहे. अनेक महिला आपले ब्रेस्ट मोठे करण्यासाठी या सर्जरीची अधिक मागणी असल्याचे डॉ. देवयानी यांनी सांगितले. काही महिलांचे ब्रेस्ट त्यांच्या अपेक्षेपेक्षा खूपच मोठे असतात यामुळे त्यांना बँक पेन,शोल्डर पेन सारख्या समस्याच उद्भवतात. अशा वेळी सर्जरी चा पर्याय स्विकारला जातो. प्रेग्नन्सी नंतर देखील आलेला स्थूलपणा घालवण्यासाठी महिला अशा सर्जरी ला पसंती देतात. 18 ते 25 वयोगटातील तरुणी अशा प्रकरच्या सर्जरी अधिक करतात असे ही डॉ. देवयानी म्हणाल्या. ”या सर्जरी करून घेण्यामध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांचे प्रमाण देखील वाढले आहे.”
”मुलांमध्ये देखील लाईफ स्टाईल किंवा जेनेटिक कारणामुळे स्थूलपणा आलेला असतो. हात, मांडी,पोटाच्या दरम्यान चरबी वाढते. अशावेळी समाजामध्ये वावरतांना अनेक मुलांचा आत्मविश्वास कमी झालेला असतो. अशी मुलं मग सर्जरी चा पर्याय स्विकारतात” असे ही डॉ . देवयानी म्हणाल्या.
”डोक्यापासून ते अगदी पायापर्यंत या सर्जरी करता येतात. या सर्जरी सुरक्षित असून 98 % सर्जरी मध्ये काहीही समस्याच जाणवत नाही. सध्या मुंबई सारख्या शहरात सर्व अत्याधुनिक साधन आणि तज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. परदेशापेक्षा कमी खर्चात या सर्जरी आपल्याकडे केल्या जातात. मात्र सर्जरी ही केवळ सुरुवात आहे त्यानंतर ‘डेली ऍक्टिव्हिटीज’ , ‘एक्सरसाईज’ आणि ‘डाएट’ देखील महत्वाचा असल्याचे डॉ देवयानी सांगतात.
”कॉस्मेटिक प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय हा प्रत्येक व्यक्तीचा असतो, मात्र काही शारीरिक कारणांमुळे समाजात वावरतांना न्यूनगंड येत असतो. अशा सर्जरीमुळे जर का आत्मविश्वास वाढत असेल तर या सर्जरी चांगला पर्याय ठरू शकतात” असे ही डॉ.देवयानी म्हणाल्या.